MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

राज्यात कुठे ऑरेंज व रेड अलर्ट? अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, काय आहे पावसाची स्थिती?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून, दुसरीकडे मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
राज्यात कुठे ऑरेंज व रेड अलर्ट? अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, काय आहे पावसाची स्थिती?

State Rain – पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात म्हणजे कोकण व घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, राज्यातील काही भागात पुढील २४ तासासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात रेड व ऑरेंज अलर्ट कुठे?

दरम्यान, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

भारतीय हवामान खात्याकडून १७ ते २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. या दरम्यान समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

दुसरीकडे मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, खेड शहरातील जगबुडी नदीचे पाणी खेड-दापोली रस्त्यावर आल्याने खेड शहरांतून दापोलीकडे जाणारी वाहतूक सुरक्षास्तव बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत २८,०७५ क्युसेक्स तसेच यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात ५४,४६६ क्युसेक इतका विसर्ग सूरू आहे.

त्यामुळं जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल  यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.