Mantralay : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, विरोधी पक्षनेते आदींना मंत्रालयाच्या आवारात वाहन पार्किंगसाठी पार्किंग पास बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच विद्यमान खासदार व आमदारांना त्यांच्या वापरात असलेल्या केवळ एका वाहनास ड्रॉपिंग पास अनुज्ञेय असणार आहे. मंत्रालय प्रवेशासाठी पार्किंग, ड्रॉपिंग पास देण्यात आलेल्या वाहनांमध्ये पास धारक व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस मंत्रालयात नो एन्ट्री असणार आहे. याबाबत मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्यासंदर्भात शासनास प्राप्त झालेल्या सूचना/निवेदने, त्याचप्रमाणे संदर्भीय शासन निर्णयानुसार काम करताना आलेले अनुभव तसेच मंत्रालय सुरक्षा प्रकल्प फेज-२ प्रकल्पांतर्गत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम प्रणाली विचारात घेवून सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
ऑफलाईन पास बंद होणार…
दरम्यान, दिव्यांग व्यक्तींच्या चारचाकी/दुचाकी वाहनांस प्रादेशिक परिवहन विभागांचे दिव्यांगाचे वाहन असे प्रमाणपत्र दिलेले असणे आवश्यक असणार आहे. माजी आमदार व खासदार यांना विधान भवनाने दिलेल्या ओळख पत्रांच्या आधारे मंत्रालयात थेट प्रवेश देण्यात येईल. मंत्रालय आवार व परिसरातील सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश डीजी ॲप’ वरच मिळणार आहे. ऑफलाईन पास मिळणाऱ्या खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत.
नवीन नियमावली जारी…
तसेच मंत्रालयाच्या आवारात येणाऱ्या वाहनांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. परंतु त्यांना आपला तपशिल विधान मंडळामार्फत माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नोंदविणे आवश्यक असेल व त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत वितरीत मंत्रालय रिफिड कार्ड व फेस रिक्नेशन प्रणालीव्दारे त्यांना प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे. विधानमंडळ येथील कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावल्यानंतर त्या आधारे मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल.
डीजी प्रवेश ॲप प्रणालीव्दारे मंत्रालय प्रवेश…
या व्यतिरिक्त उर्वरित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही कामासाठी मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांना डीजी प्रवेश ॲप या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. यासाठी मंत्रालयाबाहेर डीजी प्रवेश ॲप एक खिडकी उपलब्ध असणार आहे. तसेच मंत्रालयातून बाहेर जाताना हे कार्ड सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्व साधारण अभ्यागतांना मंत्रालयात दुपारी २ नंतर प्रवेश देण्यात येईल.





