फलटणच्या घटनेची SIT मार्फत चौकशी होणार
या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर आरोपांची राळ उठवली. या प्रकरणात त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीच मागणी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे.
फलटण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र या प्रकरणातील इतर दोन आरोपींशी झालेले तिचे चॅट समोर आले तर एक गंभीर ट्रँगल समोर येऊ शकतो. तो लोकांसमोर आणण्यासारखा नसल्याने पोलीस शांत असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले.

फलटणमध्ये नेमकी काय घटना घडली ?
फलटण इथं २३ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री उशिरा आढळला होता. फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला. मृत्यूपूर्वी डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने दोन व्यक्तींची नावं नमूद केली होती. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे, याच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. तिने या दोघांची नावं हातावर लिहिलेली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होत असून अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत.











