MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

कोकणातला लोकप्रिय यूट्यूबर हरपला, रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवसचा वेदनादायी मृत्यू

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
कोविडच्या काळात वेगळी वाट चोखाळणाऱ्या शिरीष गवस आणि पूजा गवस यांचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक झालं. दुर्देवानं शिरीष गवसचा आकाली मृत्यू झालाय. मात्र चोखाळलेली वेगळी वाट अनेकांना आदर्शवत ठरलीये.
कोकणातला लोकप्रिय यूट्यूबर हरपला, रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवसचा वेदनादायी मृत्यू

मुंबई- कोकणातील खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण लोकजीवन जगभरात पोहचवणाऱ्या रेड सॉईल स्टोरीज या यू ट्यूब चॅनेलचा कर्ता धर्ता शिरीष गवस याचा वयाच्या अवघ्या ३३ वर्षी आकस्मित मृत्यू झाला आहे.

शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस या जोडीनं यू ट्यूबवर कोकणी जीवनाचा आनंद लाखो फॉलोअर्सना दिला. शिरीष गवसच्या अशा आकस्मित मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या दोघांना एक मुलगी असून, तिच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडीओही गवस कुटुंबानं शेअर केला होता. शिरीष गवसच्या आकस्मित मृत्यूबाबत अनेक चाहते आणि सोशल मीडिया इन्फ्युअन्सर्सनी दु:ख व्यक्त केलंय.

नेमकं काय घडलं?

कोविड काळात शिरीष गवस आणि त्याच्या पत्नीनं कोकणात जाऊन यू ट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. गेल्या काही दिवसांपर्यंत शिरीश गवस व्यवस्थित कार्यरत होता. मात्र त्यानंतर त्याला मेंदूशी संबंधित आजार असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तातडीनं त्याच्यावर गोव्याच्या रुग्णालयात उपचारही करण्यात येत होते. अखेरीस त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.

शिरीष गवस यांचे वडील निवृत्त नायब तहसीलदार आहेत. संपूर्ण कुटुंबासह गावी जाऊन राहण्याचा निर्णय गवस कुटुंबीयांनी घेतला होता. सगळं व्यवस्थित सुरु असताना आता काळानं अचानक गिरीषवर घाला घातलाय.

काही दिवसांपूर्वीच शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी त्यांची मुलगी श्रीजाच्या पहिल्या वाढदिवासाचा व्हिडीओ शेअर केला होता.

 

कोविडच्या काळात स्वीकारली नवी वाट

कोविडमुळे जगावर मोठी परिणाम झाला, त्या काळात शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी मुंबईतून गावी जाण्याचा निर्णय घएतला. शिरीषचं एमबीएपर्यंत शिक्षण झालं होतं आणि तो आयटी कंपनीत नोकरीला होता. तर त्याची पत्नी पूजा सिनेसृष्टीत काम करत होती. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये जाऊन त्यांनी नवा मार्ग चोखाळण्याचा निर्णय त्या काळी घेतला.

या निर्णयानुसार त्यांनी गावी जाऊन कोकणातील जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती दाखवणारं यू ट्यूब चॅनेल सुरु केलं. Red Soil Stories असं या चॅनेलचं नाव होतं. अल्पावधीत उत्तम चित्रीकरण, कोकणाचं दर्शन, कोकणी भागातल्या रेसिपी यामुळं हे चॅनेल लोकप्रिय झालं. पूजा गवस यांच्या हातच्या कोकणातील रेसिपी आणि नवरा शिरीष गवस यांचे त्यासाठी असलेले प्रयत्न चाहत्यांना आवडू लागले होते.

या यू ट्यूब चॅनेलवरील त्यांचा बोका आणि कुत्राही लोकप्रिय ठरले होते. सध्या या चॅनेलचे 4 लाख 27 हजार सबस्क्रायबर्स आहेत. या दोघांनी मिळून 161 व्हिडीओ अपलोड केले होते.

शिरीषच्या निधनाबाबत अनेकांनी व्यक्त केलं दु:ख

शिरीष गवसच्या आकस्मित मत्यूच्या बातमीनं सोशल मीडिया आणि सोशल मीडिया इन्फ्युअन्सर्सनाही मोठा धक्का बसला आहे. कोकणातील लोकप्रिय इन्फ्लुअन्सर अंकिता प्रभूवालावलकरनंही शिरीषच्या निधनाबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या बातमीवर विश्वासच बसत नाही, असं तिनं लिहिलंय. यासह अनेकांनी शिरीषला श्रद्धांजली वाहिली आहे. सगळेचं जण शिरीषच्या अकाली एक्झिटमुळे दु:खी झाले आहेत.