पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे डोकदुखी चांगलीच वाढली आहे. पावसामुळे परिस्थिती अधिकच भीषण होत चालली आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर गुरुवारी एका 61 वर्षीय नागरिकाचा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशिनाथ काळे असे असून ते दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात गाडीचा तोल गमावला. गाडी घसरल्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्या क्षणी मागून भरधाव आलेल्या कारने त्यांना चिरडले.
अपघातात वृध्दाने गमावला जीव!
अपघात इतका गंभीर होता की त्यांनी घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असून, स्थानिकांत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून खड्डे हे अपघातांचे मुख्य कारण ठरत असताना उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे. या भीषण घटनेनंतर नागरिकांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली असून केवळ पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या अपघातात वृध्दाने जीव गमावल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यात शहरांतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न विशेष चर्चेत येतो. नागरिकांना या खड्ड्यातून वाढ काढत प्रवास करावा लागतो. काही वेळा अपघातात वाहनांचे नुकसान होते तर काहीवेळा नागरिकांना जीव देखील गमावावा लागतो. अशा परिस्थिती पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुणे शहरातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची माहिती थेट महापालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र’ नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.
खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी उपाययोजना
नागरिकांना पीएमसी रोड मित्र या ॲपच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवता येणार असून महापालिका प्रशासन त्यावर तात्काळ कारवाई करणार आहे. खड्ड्यांची संख्या आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा महापालिकेच्या पथ विभागाकडे तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नाही. अशा तक्रारींना आळा बसावा म्हणून हे ॲप तयार करण्यात आले आहे.’पीएमसी रोड मित्र’ या ॲपद्वारे नागरिक दोन-तीन फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात. यामुळे खड्ड्यांची वेगाने दुरूस्ती करणे शक्य होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
कसे वापरायचे महापालिकेचे ॲप?
फोटोमध्ये जीपीएस स्थान (अक्षांश-रेखांश) समाविष्ट असल्यामुळे खड्ड्याचे ठिकाण अचूकपणे ओळखले जाईल. ही माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाकडे आपोआप पाठवली जाईल. नोंद झाल्यावर कनिष्ठ अभियंता त्या जागी जाऊन खड्डा बुजवेल व केलेल्या कामाचे फोटो पुन्हा त्या तक्रारीस जोडेल. यामुळे तक्रारदारास पूर्वी आणि नंतरची स्थिती स्पष्टपणे दिसून येईल.





