मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला म्हणजे रविवारी रोजी करण्याचे आदेश दिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची आचारसंहिता 21 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. याचा परिणाम म्हणून 8 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या घोषणांवर मर्यादा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन हे एका आठवड्याचं होणार आहे. 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे.
हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात
नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तयारीला वेग आला आहे. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यावर्षी एकाच आठवड्यात अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रवी भवनमधील मंत्र्यांचे बंगले,आमदार निवासस्थान स्वागतासाठी सज्ज होत आहे. येत्या 7 तारखेपासूनच मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी बंगले सज्ज होत आहे.

8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात 33 पेक्षा जास्त मोर्चे धडकणार आहेत. 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली. अधिवेशनाच्या एक दिवस आधी दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समितीने मोर्चा काढण्याची परवानगी मागितली आहे. एकाने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 मोर्चे विधानभवनावर धडकणार आहे. आणखी मोर्च्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आचारसंहितेमुळे सरकारी घोषणांवर मर्यादा
दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलं असून, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कोणती घोषणा या अधिवेशनात केली जाते, याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे 11 आणि 12 डिसेंबर रोजी नागपूरमधील अधिवेशनाला उपस्थित राहतील. 8 तारखेपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात अधिवेशनाला 11 आणि 12 डिसेंबर हे दोन दिवस अधिवेशनात सहभागी होतील अशी माहिती आहे