पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगपती गौतम अदानी देखील उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर पंतप्रधान मोदींनी विमानतळाची पाहणी केली आणि तेथील सोयीसुविधा आणि आत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.
नवी मुंबईसह राज्याला विकासाला हातभार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराला जागतिक स्तरावरील मल्टी-एअरपोर्ट सिस्टीमच्या श्रेणीत स्थान मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतिम टप्प्यात दरवर्षी 90 दशलक्ष प्रवाशांना आणि 3.25 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्यास सक्षम असेल. विमानतळ परिसरात ऑटोमेटेड पीपल मूव्हर प्रणालीची सोय असून चारही प्रवासी टर्मिनल्स एकमेकांशी जोडली जाणार आहेत.

#WATCH | Navi Mumbai, Maharashtra | Prime Minister Narendra Modi inaugurates Phase 1 of the Navi Mumbai International Airport, built at a cost of around Rs 19,650 crore.
(Source: DD News) pic.twitter.com/6kSxFSHNgB
— ANI (@ANI) October 8, 2025
“राज्यातील शेतकरी युरोपात माल पाठवेल…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक असा प्रकल्प आहे ज्यामध्ये विकसित भारताची झलक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीवर हे विमानतळ बनलं आहे आणि विमानतळाचा आकार हा कमळासारखा आहे. म्हणजेच हे संस्कृती आणि समृद्धीचं जिवंत प्रतिक आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा युरोप आणि मीडल ईस्टच्या सुपरमार्केटसोबत जोडले जातील. म्हणजेच शेतकऱ्याने उत्पादन घेतलेले पीक, फळ हे वेगाने इतर देशांपर्यंत पोहोचतील.” असे पंतप्रधान म्हणाले.
वर्षाला 2 कोटी प्रवासी प्रवास करणार
पहिल्या टप्प्यात विमानतळावर एक धावपट्टी आणि एक टर्मिनल असेल. विमानतळाची क्षमता दरवर्षी २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या अनेक एअरलाइन सहयोगी कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालविण्यास रस दर्शविला आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, तात्पुरत्या स्वरूपात २०२६ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.