Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे १५०० रू. कधी मिळणार ? संभाव्य तारीख समोर

Written by:Rohit Shinde
Published:
लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत आता महिलांमधून सातत्याने सवाल उपस्थित केला जात आहे. आता नोव्हेंबर महिन्याचे १५०० रू खात्यामध्ये जमा होण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे १५०० रू. कधी मिळणार ? संभाव्य तारीख समोर

आता राज्यातील महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. १,५०० कधी मिळणार? तारीख काय असे सवाल महिलांच्या मनात आहेत. दुसरीकडे ई-केवायसी अद्याप करायची राहिली असेल तर पैसे मिळणार का असा सवाल देखील महिलांच्या मनामध्ये आहे. सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊ…

नोव्हेंबर महिन्याचे १५०० रू. कधी मिळणार ?

लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. तसेच ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख सुद्धा जवळ आली आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि ईकेवायसी केली नाही तर काय होईल? असे अनेक प्रश्न खरंतर महिलांना पडले आहेत. अशा परिस्थितीत आता या संदर्भात मोठ्या अपडेट्स समोर येत आहेत. ज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

डिसेंबरच्या अखेरीस पैसे खात्यामध्ये येणार ?

त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर म्हणजेच 21 डिसेंबरनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकार लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ई-केवायसीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तथापि, अलीकडील काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच लाभार्थी महिलांकडून आलेल्या विविध अडचणींमुळे सरकारला ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ई-केवायसीसाठी दिलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर 2025 ही निश्चित केलेली अंतिम तारीख होती, मात्र आता ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे एकूणच येणारा हप्ता तरी सरसकट सर्व महिलांना मिळेल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews