मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक सुधारली आहे. अनेक महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि कमी वेळेत होण्यासाठी ठिकठिकाणी नवनवीन महामार्ग आणि उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. सध्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) नवीन पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवेचे (Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway) काम जोरदार पद्धतीने करत आहे. सुमारे 22,000 कोटी रुपये खर्चून हा महामार्ग उभारला जात असून या एक्सप्रेस वेमुळे सध्याचा 8 ते 10 तासांचा असणारा प्रवासाचा वेळ कमी होऊन तो केवळ 3 तासांवर येणार आहे. साहजिकच प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
३ टप्प्यात काम – Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway
या महामार्गाचे बांधकाम तीन प्रमुख टप्प्यांत विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, यात पुणे–शिरूर उड्डाणपुलाचा समावेश आहे. या उड्डाणपुलामुळे पुणे–अहमदनगर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच गर्दीच्या पुणे-अहमदनगर महामार्गावरील जड वाहतूक कमी होण्यास मदत होईल.
दुसरा आणि तिसरा टप्पा हे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाशी संबंधित आहेत. ज्यामध्ये शहरांभोवती बायपास आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणी असेल. शिरूर ते संभाजीनगर हा आधुनिक सहा-पदरी महामार्ग असणार असून, या मार्गात महत्त्वाच्या शहरांना, MIDC क्षेत्रांना आणि औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे बायपास मार्ग तयार केले जाणार आहेत. मालवाहतुकीसाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरेल.
दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला निविदा उघडल्या जाण्याची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 22 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 2026 च्या सुरूवातीपासून मोठ्या प्रमाणावर काम जोरात सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
पर्यटनाला चालना मिळणार
हा महामार्ग महाराष्ट्रासाठी एक गेम-चेंजर असेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे ते छत्रपति संभाजीनगर महामार्गामुळे (Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway) प्रवाशांचा वेळ तर वाचेलच पण बीड आणि मराठवाडा सारख्या प्रदेशांमध्ये व्यापार, पर्यटन आणि नोकरीच्या संधी वाढण्यास देखील मदत होईल.





