पुणे महापालिकेचा विषय हार्ड; भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसविणार, कारण काय?

पुणे महापालिकेने श्वानांचे लसीकरण, नसबंदी आणि नियंत्रणासाठी एक नवीन तांत्रिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून शहरातील श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसविण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे शहरी भागात अनेक समस्या निर्माण होतात. रस्त्यावर मुक्तपणे फिरणारे हे कुत्रे वाहनचालकांना अडथळा निर्माण करतात आणि अपघातांची शक्यता वाढवतात. अनेक वेळा हे कुत्रे आक्रमक होऊन नागरिकांवर हल्ला करतात, ज्यामुळे जखमा आणि रेबीजसारख्या रोगांचा धोका वाढतो. तसेच, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये अन्न शोधताना ते परिसर अस्वच्छ करतात, ज्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. याच कुत्र्यांवरील नियंत्रणासाठी पुणे महापालिकेने आता मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बससविणार

शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या ती सुमारे अडीच लाखांहून अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने श्वानांचे लसीकरण, नसबंदी आणि नियंत्रणासाठी एक नवीन तांत्रिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून शहरातील श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसविण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी उपक्रम असून, त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू होत आहे.  मायक्रोचिपच्या साहाय्याने प्रत्येक श्वानाची ओळख, लसीकरणाची माहिती आणि नसबंदीचा तपशील ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

२०१८ मध्ये शहरातील भटक्या श्वानांची संख्या ३ लाख १५ हजार होती. मात्र २०२३ मध्ये झालेल्या नव्या गणनेनुसार ती कमी होऊन १ लाख ७९ हजार ९४० इतकी झाली. त्यानंतर महापालिकेत ३४ नवीन गावे समाविष्ट झाल्याने या भागांतील श्वानांची भर पडली आणि एकूण संख्या आता सुमारे अडीच लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात दररोज ८० ते ९० नागरिक श्वानांच्या हल्ल्याचे बळी ठरत असल्याने, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने उचललेल्या या पाऊलाचे सर्व स्तरांतून कौतुक होताना दिसत आहे.

भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना मोठा त्रास

भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरी भागात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे कुत्रे बहुधा कचरा डेपो, बाजारपेठा, वसाहती आणि शाळांच्या परिसरात फिरताना दिसतात. त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ अपघातांचा धोका वाढत नाही, तर सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. रेबीजसारखे संसर्गजन्य रोग या कुत्र्यांमुळे सहज पसरू शकतात. अनेक वेळा लहान मुलांवर आणि वृद्धांवर हल्ल्याच्या घटना घडतात, ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते.

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि इतर शहरी संस्था मायक्रोचिप बसवण्यासारख्या तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवत आहेत. मायक्रोचिपच्या मदतीने प्रत्येक कुत्र्याची ओळख पटवता येते आणि त्यांच्यावर लसीकरण, नसबंदी यांसारख्या उपायांचा मागोवा घेता येतो. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यास आणि शहरातील प्राणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News