Pune Traffic : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. वाहतुकीतील हे बदल आजपासून सहा दिवस म्हणजेच 21 नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कोणत्या रस्त्यांचा अवलंब करावा हे सुद्धा सांगण्यात आला आहे याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
कोणत्या रस्त्यांवरील वाहतूक बंद (Pune Traffic)
विश्रांतवाडीहून बोपखेल फाट्याद्वारे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरून ट्रक, कंटेनर आणि इतर जड वाहने हलू शकणार नाहीत. अशा वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कार्तिकी वारीलाआळंदी येथे हजारो वारकरी दर्शनासाठी येतात. साहजिकच यामुळे संपूर्ण परिसरात मोठी गर्दी होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते. ही संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येरवडा आणि वाघोली वाहतूक विभागांनी वाहतुकीत बदल केला आहे. हे नवे बदल 21 नोव्हेंबर पर्यंत लागू असतील. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना याची माहिती घेणं आवश्यक आहे. (Pune Traffic)

पर्यायी मार्ग कोणते??
विश्रांतवाडीहून बोपखेल फाट्याद्वारे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून येरवडा, खडकी येथील होळकर पुल, जुन्या मुंबई-पुणे या पर्यायी मार्गांचा वापर करायचा आहे.
तसेच नगर रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जावे आणि तेथून पुढे आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचावे असे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नगर रस्त्यावरून तुळापूर फाटा मार्गे आळंदी- मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.











