जिल्हा परिषद शाळा ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील मुलांसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मुख्य केंद्र ठरतात. या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जातो, जेणेकरून गरीब व मध्यमवर्गीय मुलांना उच्च शिक्षणासाठी पायाभूत तयारी मिळेल. जिल्हा परिषद शाळा स्थानिक गरजेनुसार अभ्यासक्रम आखतात, तसेच संस्कार, सामाजिक मूल्ये व शिस्तीचे महत्व शिकवतात. असंच काहीसं शिक्षण देणारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगरची शाळा एका वेगळ्याचं कारणाने चर्चेत आहेत.
जालिंदरनगरच्या शाळेला पुरस्कार
ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५ वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉइस ॲवार्ड’साठी निवड केली आहे. अबुधाबी येथे वितरण टी फोर एज्युकेशन संस्थेतर्फे १५ आणि १६ नोव्हेंबरला अबुधाबी येथे वर्ल्ड स्कूल समिट होणार असून, त्यामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. कोविडकाळात ज्या शाळांनी सर्वोत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला अशा शाळांना हा पुरस्कार दिला जातो. खेड तालुक्यातील या शाळेत विद्यार्थ्यांना विषयानुकूल अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थी एकमेकांनाही शिकवतात.

शाळेच्या कार्याची जगभरात दखल
या शाळेतील एका शिक्षकाने सांगितले की, ”या पुरस्कारामुळे आमच्या शाळेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. दुर्गम असलेल्या जालिंदरनगरच्या या शाळेत २०२२ साली केवळ तीन विद्यार्थी होते. कमी पटसंख्या असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. पण दोन वर्षांत या शाळेने परिवर्तन घडून आणले. दत्तात्रय वारे यांनी हे परिवर्तन केवळ पायाभूत पातळीवर झाले नाही, तर शैक्षणिक स्तरावरही हा बदल घडून आला आहे”.या जिल्हा परिषद शाळेची निवड ही ५० शाळांच्या यादीमधून करण्यात आली आहे. या शाळेला पुरस्कार देण्यासाठी सर्वाधिक मतदान मिळाले. ‘टी४ एज्युकेशन’ संस्था जगभरातील सुमारे १०० देशांमधील दोन लाख शिक्षकांचे प्रतिनिधित्व करीत आहे.