MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्टला आदिती तटकरे झेंडा फडकवणार; भरत गोगावलेंना संताप अनावर, म्हणाले…

Written by:Rohit Shinde
Published:
आता रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंची चांगलीच हेटाळणी होताना दिसत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही पेटताच आहे. रायगड जिल्ह्याचं प्रकरण तर फारच चर्चेत आहे.
रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्टला आदिती तटकरे झेंडा फडकवणार; भरत गोगावलेंना संताप अनावर, म्हणाले…

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री आणि सहकारी आमदार यांना अनंत अडचणींना सामोर जावे लागत आहे. अनेक ठिकाणी त्यांना डावलले जात आहे. अशा परिस्थितीत आता रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंची चांगलीच हेटाळणी होताना दिसत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही पेटताच आहे. रायगड जिल्ह्याचं प्रकरण तर फारच चर्चेत आहे. रायगड जिल्ह्यासाठी स्वातंत्र्यदिनामित्तच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यावर मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मंत्री भरत गोगावले आक्रमक

मंत्री आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळणार हे समजल्यानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे. “माझ्या पराभवसाठी महायुतीच्याच काही लोकांनी देव पाण्यात ठेवलं होतं,” असा आरोप त्यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात शिवसेनेकडून निर्धार मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात भरत गोगावले बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली.

सुनील तटकरे आणि मुलीवर घणाघात

“मी आज मंत्री झालो. हा भरत गोगावले निवडून येऊ नये म्हणून महायुतीच्या काही नेत्यांनीही देव पाण्यात ठेवले होते. मात्र, जनतेच्या आशीर्वादानं मी 26 हजार 200 मतांनी निवडून आलो”, असं गोगावले म्हणाले. आम्ही गोरगंरीबाचे शेठ आहोत. आम्ही शासनाला लुटणारे नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत सुनिल तटकरे यांना थेट लक्ष्य केलं. उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी कधीही कोणत्याही प्रकल्पाला आईचं नाव दिलेलं नाही. सुनील तटकरेंनी सांगितलं मी 10 कोटी देतो पण माझ्या आईचं नाव द्या, अशी टीका गोगावले यांनी केली. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी एका भाषणादरम्यान, हातात रुमाल घेत भरत गोगावले यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्याचाही समाचार गोगावले यांनी घेतला. काही लोकांनी आमच्या रूमालाची टिंगल केली. पण आम्ही शून्यातून इकडे आलेलो आहोत, असा टोलाही गोगावले यांनी लगावला. आगामी काळात हा वाद कोणते वळण घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.