Rain Alert: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हवामान विभागाकडून आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रात घोंघावत असलेल्या कमी दाब प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांत देखील सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय…

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता

आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान 29 अंशापार राहत असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यास विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर राहील. दक्षतेचा यलो अलर्ट आयएमडीकडून देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव राहू शकतो.

मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या कमी दाब्च्या क्षेत्रामुळे बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह लगतच्या परिसरांना सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 450 किमीवर आहे. त्याचे रुपांदर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर जात असले तरी सोमवारी त्यात बदल होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे.

29 ऑक्टोबरनंतर पावसाची पूर्णपणे उघडीप ?

दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस 29 ऑक्टोबरनंतर पूर्णपणे उघडीप देईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या काळात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसण्याच्या अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.  तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News