राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे. मान्सूनने राज्यातून माघार घेतल्यानंतर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज आणि पुढील 2 दिवसांत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेती आणि शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे आणि सातारासह 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी स्पेशल पॅकेज देखील जारी करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कोमोरीन भागाकडे सरकू लागली आहे. यामुळे लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील हवामानात बदल होत असून आज कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
तर दुसरीकडे काढणीला आलेले पीक लवकरात लवकर काढावे आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.
तूरकळ ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे.











