राज्यावरील पावसाचे संकट आणखी गडद झाले आहे. मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. बीड, धाराशिव, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये रात्रीभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्हा परिषदेच्या शाळा पाण्याखाली गेल्या आहेत. माजलगाव तालुक्यातील बडेवाडी शाळेला तर तळ्यासारखे स्वरूप आले आहे. वर्गातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांना अघोषित सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
लातूर जिल्ह्यात मांजरा, तेरणा, रेणा आणि तावरजा नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांजवळील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लातूर–बिदर–हैदराबाद महामार्गासह अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, माढा परिसरात तब्बल 74 हजार हेक्टर पिके पाण्याखाली गेली असून शेकडो घरांची पडझड झाली आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून विस्थापित शिबिरात त्यांचा तात्पुरता आश्रय घेतला जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

परभणी जिल्ह्यात शेती-पिकांची हानी
धाराशिव जिल्ह्यात पुरस्थिती; पाऊस थांबेना!
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. या पावसात भूम परंडा परिसरातील नळी, दुधना, बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुन्हा नद्या धोक्याच्या पातळी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत. अनेक भागात पुरस्थिती असून हे चित्र आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे.
आज अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका
राज्यातील 9 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागामार्फत, राज्यात नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात 27 सप्टेंबर 2025 रोजीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पुणे, जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.











