राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भासह, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस पावसाचा हा अंदाज असाच राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह कोकण आणि घाटमाथा परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊ…
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज 31 जुलै रोजी, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून, संपूर्ण विदर्भाला पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती जवळपास 3 ऑगस्टपर्यंत अशीच राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यात पावसाची शक्यता
मराठवाड्यातील नांदेड आणि आसपासच्या भागांमध्येही हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एकंदरीत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची स्थिती बदलत असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन कामाचे नियोजन करावे असे आवाहन केले जात आहे.
2 आणि 3 ऑगस्टचा पावसाचा अंदाज
2 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरण्याचा अंदाज आहे. या दिवशी विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ कायम राहील. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेडसह पालघर, नाशिक घाटमाथा, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रविवारी 3 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह धुळे, नंदूरबार, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांनी या काळात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. शहरी भागातील नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडावे तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतामध्ये काम करताना नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. विजांपासून बचाव आवश्यक आहे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.





