राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाचे धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारख्या चांगला परतावा देणाऱ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची आणि मदतीची मागणी केली जात असताना आता काँग्रेसने देखील मागणी उचलून धरली आहे.
शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा अन् पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, “ज्वारी, कपाशी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पशुधनाचाही फटका बसला आहे. अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळच्या अतिवृष्टीचे नुकसानभरपाईचे पैसे अजून मिळाले नाहीत, त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचे हातचे पिक हिरावून घेतले आहे. एकीकडे सरकार कर्ज काढत आहे, मग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लागेल तर अजून कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे,” अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.
राज्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला असून अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी ते विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत.
पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला असून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होणार आहे, यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सातारा, रायगड, पुणे, कोल्हापूरध्ये रेड अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड जालना या भागात ऑरेंज अलर्ट आहे.





