MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, अनेक बंधारे पाण्याखाली

Written by:Rohit Shinde
Published:
काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, अनेक बंधारे पाण्याखाली

राज्यभरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र बघायला मिळाले. कालही सर्वदूरपर्यंत पाऊस होता. आज पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरात पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस अजूनही झाला नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यामुळे मराठवाड्यात मोठा पाऊस कोसळणार कधी? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे.

पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पंचगंगेची पाणीपातळी 35 फुट 9 इंचावर पोहचली असून जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांना पूर आला आहे. 57 बंधारे पाण्याखाली गेली आहेत.पंचगंगा नदी यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पात्राबाहेर गेली आहे. राधानगरी धरणासह सह दूधगंगा, तुळशी , कुंभी, वारणा, पाटगाव धरणातून विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे

पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत चांगल्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. काही भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

दरवर्षीपेक्षा यावेळी राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला. सध्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. राज्यात यंदा पाऊस चांगला राहण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे शेवटच्या काळात पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची सरासरी भरून निघते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची चिन्हे आहेत.