महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव आता वाढू लागणार आहे. राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. तीन ते चार दिवस काहीसी विश्रांती घेतल्यानंतर आता पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा एकदा मान्सून बरसणार आहे. आज कोकण, मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील 20 जिल्ह्यांना आज गुरुवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उद्या शुक्रवारी देखील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज
मराठवाडा आणि दक्षिण कोकण गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.विदर्भात आज गुरुवारी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उद्या शुक्रवारी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर वाढणार!
गुरुवारी हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर शुक्रवारी संपूर्ण मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला देखील पुढील दोन दिवस पाऊस झोडपणार आहे. गुरुवारी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यासह कोणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी देखील कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाटमाथ्यासह संपूर्ण मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या जोर वाढल्यानंतर आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.





