मुंबईत दिवाळीच्या काळात फटाक्यांबाबत निर्बंध लागू; रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी

Rohit Shinde

अवघ्या आठवड्याभरावर दिवाळी आली असून घराघरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. साफसफाई, फराळ, कंदील, पणत्या यांचीही खरेदी सुरू आहे. पण दिवाळी म्हटलं की सगळ्यांना सर्वात पहिले आठवतात ते फटाके.. फुलबाजी, भुईचक्र, अनार, लवंगी, सुतळीबॉम्ब असे अनेक फटाके सर्वजण आनंदाने फोडतात.  या काळात फटाके विक्रेत्यांना देखील सुगीचे दिवस येत असतात. मात्र आता मुंबईत या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई रस्त्यांवर फटाकेविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने हा कडक निर्णय घेतला असून विनापरवाना फटाकेविक्रीवर ‘बॅन’ लावण्यात आला आहे.

विनापरवाना फटाके विक्रीस मुंबईत बंदी

दिवाळीच्या आधीच ​मुंबईतील रस्त्यांवर आणि पदपथांवर फटाकेविक्री करणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यांवर फटाकविक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अवैध आणि धोकादायक विक्री थांबवण्यासाठी 15 ऑक्टोबर पासू ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. रस्त्यांवर फटाके विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार, एवढंच नव्हे तर त्यांचा मालही जप्त होणार.

पुण्यात विक्री आणि वाजविण्यावर निर्बंध

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फटाके वाजवण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आधीच नियमावली निश्चित केली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

पुणे शहरात 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तात्पुरत्या परवानगीवर फटाक्यांची विक्री करता येणार आहे. पण महामार्गावर, पुलावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे आणि अग्निबाण  उडवणे पूर्णपणे बंद आहे. फटाक्यांचा आवाज 125 डेसिबलपेक्षा जास्त नसावा, असा नियम करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे फटाके वाजविणारे आणि विक्री करणारे दोन्हींवर निर्बंध आले आहेत.

ताज्या बातम्या