वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ देऊनही अद्याप अनेक वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविलेली नाही. अशा परिस्थितीत आता वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परिवहन आयुक्तांनी कठोर निर्देश दिले आहेत की, वाहनांची पुनर्नोंदणी , परमिट नूतनीकरण HSRP असल्याशिवाय करू नका! त्यामुळे या बदलाचा आता वाहनधारकांना सामना करावा लागणार आहे.
HSRP नंबर प्लेट नसेल तर…
परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या वाहनांवर HSRP बसवलेली नाही, त्यांच्याशी संबंधित काही महत्वाची कामे थांबवली जाणार आहेत. आरटीओच्या भरारी पथकांनी HSRP नसलेली जी वाहने जप्त केली आहेत, ती HSRP बसवल्याशिवाय सोडू नयेत, असा आदेश परिवहन आयुक्तांनी दिला आहे. तसेच, ज्या वाहनांकडे HSRP संबंधित पावती किंवा अपॉइंटमेंटचा पुरावा नाही, अशांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- मालकी हस्तांतरण थांबवले जाईल.
- आरसीवरील पत्ता बदलता येणार नाही.
- कर्ज नोंदी करणे किंवा रद्द करणे शक्य नाही.
- जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी होणार नाही.
- परमिट नूतनीकरणही थांबवले जाईल.
राज्य सरकारने दिलेल्या या चौथ्या मुदतवाढीनंतरही जर वाहनमालकांनी HSRP बसवली नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई टाळता येणार नाही. HSRP ही केवळ नियमांची बाब नसून, वाहन सुरक्षा आणि चोरी प्रतिबंधासाठी महत्त्वाची आहे. ती बनावट नंबर प्लेट्सचा वापर रोखते आणि चोरी झालेल्या वाहनांचा मागोवा घेण्यास मदत करते.
30 नोव्हेंबरची मुदतवाढ मिळाल्याने दिलासा
ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत आहेत, त्यांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 होती. पण वाहन मालकांकडून प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे सरकारने अखेर आता मुदत वाढवली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे चालकांना अथवा वाहन मालकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी आणखी मुदत मिळणार आहे. भविष्यातील दंडात्मक अथवा होणारी कायदेशी कारवाई टाळायची असेल तर तुम्ही देखील या नंबर प्लेट तात्काळ बसवून घ्या…





