भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पोस्टपोन करण्यात आलं आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रविवारी सांगलीमध्ये पार पडणारा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. बॉलिवूड संगीतकार आणि स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल याची बहीण पलक मुच्छालने लग्न स्थगित झाल्याबद्दल अपडेट दिली आहे. मात्र आता लग्नाच्या संदर्भात अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा आंनी मीडियाला अपडेट दिली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना नाश्ता करत असताना त्यांची प्रकृती बिघडली, यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. स्मृती वडिलांच्या जवळची असल्यामुळे वडील पूर्ण बरे होईपर्यंत लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे, असं स्मृतीच्या मॅनेजरने सांगितलं. मात्र, 24 नोव्हेंबरच्या संध्याकाळी स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुडा आणि लग्नाबद्दलच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. स्मृतीची मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जसह तिच्या सहकाऱ्यांनीही लग्नाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ डिलीट केले, त्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या.

स्मृती आणि पलाशचे लग्न मोडले ?
सांगलीमध्ये विवाहपूर्वीचे सर्वकाही कार्यक्रम व्यवस्थित सुरू असतानाच अचानक या लग्न सोहळ्यात एक ट्विस्ट आला. ज्यामुळे हा विवाह सोहळा सध्या लांबणीवर पडला आहे. यासाठी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीचे कारण दिलं जात आहे. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर मात्र अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे खरंच स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे हे लग्न लांबीवर पडले की, आणखी काही वेगळं आहे. हे लवकरच समोर येईल, मात्र या चर्चा नेमक्या काय आणि त्यांना दुजोरा देणाऱ्या घटना काय? जाणून घेऊ…
सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांमध्ये स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुछाल याचे मेरि डिकॉस्टा नावाच्या मुलीशी अफेअर सुरू होतं. ज्याचं चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातून पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला आहे. धक्कादायक म्हणजे हे चॅट स्मृती सोबत लग्न नक्की झाल्यानंतरचे आहेत. असे एक ना अनेक तर्त लावले जात आहेत. मात्र या व्हायरल चॅट वरती अद्याप पलाश आणि स्मृती या दोघांनी देखील खुलासे केलेले नाहीत. मात्र या व्हायरल चॅटमुळे हे लग्न पुढे ढकललं गेलं आहे का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
सोशल मिडियावरील चर्चांना दुजोरा मिळणाऱ्या घटना समोर त्यामध्ये स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांची अँजिओग्राफी झाली आहे. मात्र त्यामध्ये कोणतेही ब्लॉकेजेस मिळालेले नाहीत असे रिपोर्ट देखील समोर आले आहेत. तसेच या विवाह सोहळ्याबाबत उलट सुलट चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्मृतीने आपल्या इंस्टाग्राम वरून हळद, मेहंदी आणि साखरपुडा यासारख्या सर्व विवाह संबंधित पोस्ट हटवल्या आहेत. अशी अनेक संशयास्पद कारणे सध्या दिसत आहेत.
पलाशच्या आईने काय कारण दिले ?
25 नोव्हेंबरच्या सकाळपासून पलाश मुच्छलचे कथित व्हॉट्सऍप चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात तो एका महिलेसोबत बोलत असल्याचा दावा करण्यात आला. मेरी डिकोस्टा नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने सगळ्यात आधी हे चॅट शेअर केले, यानंतर रेडिटवर मोठ्या प्रमाणावर हे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. पण आता मेरी डिकोस्टाचं इन्स्टाग्राम अकाउंट डिऍक्टिव्हेट झालं आहे. त्यामुळे एकूण संशय व्यक्त केला जात असताना पलाशच्या आईन वेगळेचं स्पष्टीकरण दिले आहे.
“पलाश आणि स्मृतीच्या वडिलांचं भावनिक नातं निर्माण झालं आहे, पलाश स्मृतीच्या वडिलांशी भावनिकरित्या जोडला गेला आहे. त्यामुळे स्मृतीचे वडील पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय पलाशने घेतला,” असं पलाशची आई म्हणाली. सोमवारी पलाश आणि त्याचं कुटुंब मुंबईला परतलं, यानंतर पलाशला गोरेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आलं. लग्न पुढे ढकललं गेल्यामुळे पलाशवर तणाव आला आणि त्याची प्रकृती बिघडली. तो 4 तास रडत होता, अशी माहिती पलाशच्या आईने दिली. त्यामुळे एकूणच हे लग्न होणार की नाही? लग्नाचं भवितव्य काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.











