गेल्या महिन्याभरात मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 11 आणि राजस्थानमधील 3 मुलांच्या मृत्यूनंतर दोन्ही राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मुलांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, कफ सिरप प्यायल्यानंतर मुलांचं आरोग्य वेगानं बिघडू लागलं आणि परिणामी त्यांना वाचवता आलं नाही. यामधील काही बालकांचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील ड्रग कंट्रोल विभागानं शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी तामिळनाडूत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी आणली होती.
तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोल विभागानं चौकशीत श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये ‘भेसळ’ असल्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आता यासंदर्भात महाराष्ट्रात आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या परवानगी विना कफ सिरपची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची धडाका
मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तामिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमध्ये भेसळीमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आता महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. बाल रुग्णांसाठी ‘सिरप’ प्रवर्गातील औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध विभागाकडून देण्यात आला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 अंतर्गत अनुसूची एच,अनुसूची एच-1 आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तरी सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री कोणी करत असेल, तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कारवाईचा इशारा देऊनसुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कप सिरपची विक्री करणे महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने 20 दुकानांना टाळे ठोकले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मोठी कारवाई
पुणे विभागात गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून मध्य प्रदेशात कप सिरप या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने पुण्यात तपासणी मोहीम सुरू केली. पुणे विभागात पुणे, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे येतात. त्यात पुण्यात सर्वाधिक 17 दुकानावर तर सांगलीमध्ये 2 तर सोलापूरमधील एका औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.











