मनसे युतीबाबत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, दसऱ्याला ठाकरे बंधूंमध्ये वैचारिक सोन्याचं आदानप्रदान होऊ शकतं

Astha Sutar

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील गाठीभेटी वाढल्या आहेत. हे दोन बंधू पालिका निवडणुकीत एकत्र येणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा होईल, राज-उद्धव एका व्यासपीठावर येतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक विधान करीत या चर्चांना बळ दिलं आहे.

दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान होऊ शकतं

दरम्यान, “शिंदेंनी त्यांचा मेळावा सूरत, अहमदाबाद किंवा बडोद्यात घ्यावा. त्यांनी जय शाह किंवा अमित शाहांना मुख्य प्रवक्ते म्हणून बोलवावं. मुंबईतला दसरा मेळावा हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. बाकी सगळं बोगस आहे”, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसेच राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेलेच आहेत. अनेक विषयांवर चर्चा करताहेत. एकमेकांशी संवाद साधताहेत, विचारांची देवाणघेवाण करताहेत. त्यांच्यात दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान होऊ शकतं, असंही संजय राऊत म्हणाले.

तत्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या

शेतकऱ्यांचं उभं पीक नष्ट झालं असून, त्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. पाच-दहा हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे, असंही संजय राऊत म्हणाले. तसंच कर्जवसुली थांबवण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही त्यांनी केली. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. सरकारनं प्रत्यक्ष पूरस्थिती आहे, तिथं कॅबिनेट घ्यायला हवी होती. पण मुख्यमंत्री दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेले. अहवाल पाठवला की नाही, हे माहिती नाही. निकष बदलले जात नाहीत, असं सांगून पूरस्थितीशी सामना केला जात नाही.

ताज्या बातम्या