मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या मुंबईतील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. खरंतर मराठा समजाला ओबीसी कोट्यातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईत आले होते. मात्र आता आंदोलकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईत कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काल रात्रीपासून दक्षिण मुंबईत पावसाची संततधार आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचा मुक्काम असलेल्या आझाद मैदानात सर्वत्र चिखल झाला आहे. शिवाय राहण्याची सोय, नैसर्गिक विधी याबाबतीत आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे काही आंदोलक परतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
सरकार आणि जरांगेंमध्ये आज चर्चेची शक्यता
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानातील या आंदोलनाला मुंबई पोलीस आणखी किती काळ परवानगी देतात, हे बघावे लागेल. राज्य सरकार आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. खरंतर आंदोलनाचा आजचा दिवसत परवानगी आहे, त्यामुळे ही परवानगी आणखी काही काळ वाढवून मिळणार का हे पाहणे देखील त्यानिमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे.
- हैदराबाद गझेटियर, सातारा गॅझेटीयर, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आले आहेत.
- सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे आरक्षणात घेण्याची मागणी.
- सरसकट गुन्हे मागे घेणार होते. त्यासंदर्भात आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
- ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत टीकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे.
एकीकडे सत्ता आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी जरांगेंच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे राज्य सरकार अजूनही कोणता सकारात्मक प्रतिसाद जरांगेंना देताना दिसत नाही. अशा परिस्थितीत या आंदोलनाचे नेमके काय होणार? मनोज जरांगेंच्या मागण्यांचं नेमकं काय होणार, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. शिवाय मराठा आंदोलनाची धग कमी करण्यासाठी सरकार काही हालचाली करत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे.





