काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकरांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास

Rohit Shinde

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाच दशकांहून अधिक काळ संसदीय व प्रशासकीय क्षेत्रात भक्कम उपस्थिती राखलेल्या पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल अशा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. अभ्यासू, शांत आणि नैतिक नेतृत्वाची ओळख असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिवराज पाटील चाकूरकरांबद्दल थोडक्यात…

शिवराज पाटील यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.

राष्ट्रीय-राज्य पातळीवर उल्लेखनीय कार्य

1991 ते 1996 या कालावधीत ते देशाचे 10 वे लोकसभा अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात संसदेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, कामकाजाचे थेट प्रसारण आणि संसद ग्रंथालयाच्या नव्या इमारतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. संसदीय परंपरा मजबूत करणारे आणि सभागृहातील शिस्त राखणारे अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद दिले. परंतु 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटींसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ही घटना भारतीय राजकारणातील नैतिकता दाखवणाऱ्या ठळक प्रसंगांपैकी एक मानली जाते.
यानंतर 2010 ते 2015 या कालावधीत त्यांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि समन्वयाला विशेष महत्त्व दिले गेले. भारतीय संसदीय परंपरेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, 1963 मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आणि दोन नाती आहेत. सत्य साई बाबांचे ते निष्ठावंत अनुयायी होते आणि अध्यात्माशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. एकूणच शिवराज पाटील चाकूरकरांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या