Shivsena – सनातन दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. दहशतवादाला रंग नसतो, धर्म नसतो असे सांगणारे काँग्रेसवाले आता सनातन आतंकवाद का म्हणत आहेत. या काँग्रेसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हिंदू म्हणवणारे उबाठा का आता मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी विचारला.
काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी…
दरम्यान, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप भारतीयांची हत्या केली, आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू दहशतवाद, सनातन आतंकवाद बोलून जो करंटेपणा दाखवला त्याचा शिवसेना तीव्र शब्दांत निषेध करतो, असं शिवसैनिकांनी म्हटले. तसेच हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट असून चव्हाण यांनी हिंदूंची माफी मागावी… तर ठाण्यात सुद्धा युवा सेनेकडून काँग्रेस व पृथ्वीराज चव्हाणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
काँग्रेसकडून हिंदूंना बदनाम करण्याचे काम…
दुसरीकडे हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, असे शब्द वापरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंग, सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम यांनी हिंदूंना बदनाम करण्याचे काम केले. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयितांना काँग्रेस सरकारने १७ वर्ष छळण्याचे काम केले. त्यांची निर्दोष मुक्तता केल्यामुळं काँग्रेसचा तिळपापड होत आहे. काँग्रेसची विचारधारा ही तुष्टीकरणाची आहे. असा आरोप शिवसैनिकांनी केला. अशी घणाघाती टीका आमदार मनिषा कायंदे यांनी केली.





