MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

शिवसेनेचा मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंवर निशाणा, व्यंगचित्रातून बोचरी टीका

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मिठी नदीच्या गाळ उपशाची ही कामे उबाठा गटाची महापालिकेवर सत्ता असतानाची काळातली आहेत. त्यामुळे उबाठा गटाचे नेते व आदित्य ठाकरेंचे मित्र आणि बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया यांच्यावर आरोप आहेत.
शिवसेनेचा मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंवर निशाणा, व्यंगचित्रातून बोचरी टीका

Aditya Thackeray : २६ मे रोजी पावसाने मुंबईची तुंबई केल्यानंतर आता मिठी नदीतील गाळ उपसावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया आणि त्यांचे जवळचे मित्र व उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. याचा धागा पकडून शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून व्यंगचित्र काढून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून मिठी नदी गाळ उपसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना यातून चांगलेच फटकारण्यात आले आहे.

६५ कोटींहून अधिक घोटाळा…

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जात असून याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींच्या संभाषणात सातत्याने बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया व त्यांचे भाऊ सँतिनो मोरिया यांची नावे येत आहेत. मुंबईतील मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात ६५ कोटींहून अधिकचा झालेला घोटाळा सध्या राजकीय चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेने आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिनो मोरिया यांची तीन वेळेस चौकशी सुद्धा केली आहे. याच प्रकरणाचा आधार घेत शिवसेनेने आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात मिठी नदीरूपी तिजोरीतून एक उंदीर पैसे काढत असून तो मातोश्री – २ नावाच्या बॅगमध्ये टाकत असल्याचे दिसते आहे. यातील उंदिराला आदित्य ठाकरेंचा चेहरा लावून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. हे व्यंगचित्र सध्या व्हायरल झाले असून आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड संबंधांवरही यामुळे प्रकाश टाकण्यात आला आहे.