मुंबईतील वातावरणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. मुंबईला कधीकाळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात होते. तरी २०२५ या संपूर्ण वर्षात हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या संपूर्ण परिस्थितीतमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईकरांनी देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने केलेल्या काही उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे.

महापालिकेच्या उपाययोजना; AQI मध्ये सुधारणा
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये खासगी प्रकल्पांसह रस्ते, मेट्रो आदी शासकीय प्रकल्पांचाही समावेश आहे. वाऱ्याच्या वेगातही आता सुधारणा झालीय. या सर्वसमावेशक कारणांमुळे मुंबईतील AQI मध्ये म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले असून, महापालिकेने स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न केलाय.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, “वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये बेकरी तसेच स्मशानभूमीचे स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टिंग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुऊन काढणे आणि विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी 15 ऑक्टोबर 2024 रोजी महानगरपालिकेने 28 मुद्द्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत. हीच मार्गदर्शक तत्त्वे यावर्षी देखील पुन्हा लागू करण्यात आली आहेत.”
26 नोव्हेंबरपासून मुंबईतील एक्यूआयमध्ये सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. हे सर्व प्रशासनाने केलेल्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीमुळे झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 28 नोव्हेंबरपूर्वी वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 4 किलोमीटर होता, तसेच वातावरणात आर्द्रता होती. मात्र, आता त्यात सुधारणा होऊन वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 18 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत आहे.
मुंबईकरांनो, आरोग्याची काळजी घ्या !
हवा प्रदूषण वाढल्यावर श्वसन विकार आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घेणे अनिवार्य ठरते. प्रदूषक कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन श्वास लागणे, खोकला वाढणे, दमा तीव्र होणे अशी लक्षणे निर्माण करू शकतात, तर हृदयाच्या रुग्णांमध्ये छातीत दडपण, धडधडीची वाढ आणि रक्तदाबातील बदल दिसू शकतात. अशा परिस्थितीत सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाणे शक्यतो टाळावे, तसेच बाहेर जाताना N95 मास्कचा वापर करावा. घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास एअर प्युरीफायरचा वापर करावा. शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त ठरते. औषधे वेळेवर घेणे आणि कोणतीही लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
दक्षिणेतील शहरांत हवा समाधानकारक
दक्षिण भारतातील चेन्नई आणि पुद्दुचेरीतील निवासी भागांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या हवा अधिक स्वच्छ आढळून आली आहे. विजयवाडा आणि कोलकात्यामध्ये काही ठिकाणी प्रदूषण असले तरी, ते मुंबईतील देवनारसारख्या भागांइतके सातत्यपूर्ण आणि गंभीर नाही, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. थोडक्यात काय तर दक्षिण भारतातील बहुतांश शहरांतील हवेची गुणवत्ता अद्याप समाधानकारक आहे, हेच यावरून स्पष्ट होते.











