MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

बहिणींनो, भावाला आज ‘या’ शुभ-मुहूर्तामध्येच राखी बांधा; अवघा 7 तास 37 मिनिटांचा कालावधी, वेळ जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
आज भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन सर्वदूर साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता शुभ-मुहूर्तावर हा सण साजरा करणे महत्वाचे. जाणून घ्या शुभ-मुहूर्ताबद्दल...
बहिणींनो, भावाला आज ‘या’ शुभ-मुहूर्तामध्येच राखी बांधा; अवघा 7 तास 37 मिनिटांचा कालावधी, वेळ जाणून घ्या!

09 ऑगस्ट, शनिवारी सर्वत्र रक्षाबंधन साजरा होत आहे. रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय पवित्र आणि भावनिक सण असून, तो भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाची भावना दृढ करणारा आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. ‘रक्षा’ म्हणजे संरक्षण आणि ‘बंधन’ म्हणजे नात्याची गाठ. या दिवशी बहिणी भावाच्या उजव्या हाताला राखी (राखी किंवा रक्षा सूत्र) बांधतात, त्याच्या दीर्घायुष्याची, आरोग्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु हा रक्षाबंधन शुभ-मुहूर्तावर साजरा केला, तर अधिक फायदा होईल. शुभमुहूर्ताच्या वेळेबाबत सविस्तर जाणून घेऊ…

7 तास 37 मिनिटांचा शुभ-मुहूर्त

यावेळी रक्षाबंधनावर भद्रा काळाचा परिणाम दिसत आहे. या वर्षी रक्षाबंधनाला वैभव आणि सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी  5:47 ते दुपारी 1:24 पर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. म्हणजेच, काय तर यंदा भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा 7 तास 37 मिनिटे आहेत. या काळात तुम्ही भावाला राखी बांधली तर ते अधिक शुभ ठरणार आहे. रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू पंचांगनुसार, यावेळी श्रावण पौर्णिमेची तारीख 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजेपर्यंत राहिल.

9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ सकाळी 9:07 ते 10:47 पर्यंत असेल. म्हणजे थोडक्यात काय तर राहू काळाची सावली सुमारे 1 तास 40 मिनिटे राहील. या रक्षाबंधनामध्ये सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 5:47 ते दुपारी 2:23 पर्यंत असेल. सर्व कार्यांच्या पूर्तीसाठी हा योग सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही या काळात राखी बांधली तर तुमचे नाते आणखी मजबूत आणि समृद्ध होईल.

रक्षाबंधनाची धार्मिक पार्श्वभूमी

रक्षाबंधनाचा उल्लेख वेद, पुराणे आणि ऐतिहासिक आख्यायिकांमध्ये आढळतो. भविष्यपुराण व पद्मपुराण मध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व वर्णन केले आहे. महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हाताला कापडाचा तुकडा बांधून त्याचे रक्त थांबवले, त्याबदल्यात श्रीकृष्णाने तिचे आयुष्यभर रक्षण केले, ही कथा प्रसिद्ध आहे. तसेच, इंद्रयुद्धाच्या वेळी इंद्राणीने इंद्राच्या हाताला रक्षा सूत्र बांधून त्याच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. या दिवशी बांधलेले रक्षा सूत्र नुसते भावंडांपुरते मर्यादित नसून गुरु-शिष्य, राजा-प्रजा, मित्र यांच्यातही बांधण्याची प्रथा आहे.

सण साजरा करण्याची योग्य पद्धत

सकाळी स्नान करून देवपूजा – श्रावण पौर्णिमेला स्नान केल्यानंतर घरातील देवस्थान स्वच्छ करून श्रीगणेश, श्रीविष्णू किंवा कुलदैवताची पूजा केली जाते.

राखी पूजन – राखी किंवा रक्षा सूत्र हळद-कुंकू, अक्षता, फुले आणि धूप-दीपाने पूजले जाते.

भाऊच्या उजव्या हाताला राखी बांधणे – बहिण प्रथम भावाच्या कपाळावर ओवाळणी करून तिळक लावते, नंतर उजव्या हाताला राखी बांधते आणि गोडधोड पदार्थ खाऊ घालते.

भावाचे वचन – भाऊ बहिणीचे आजन्म रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू किंवा आशीर्वाद देतो.

आध्यात्मिक आणि धार्मिक लाभ

रक्षाबंधनाचा आध्यात्मिक आणि धार्मिक लाभ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राखी हे दैवी संरक्षणसूत्र असून, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा व वाईट शक्तींपासून रक्षण होते, असे मानले जाते. हा सण भावंडांतील प्रेम आणि विश्वास दृढ करून घरातील एकोप्याला बळकटी देतो. या दिवशी बहिण-भावाने एकत्र देवपूजा केल्यास पुण्य मिळते आणि पितृदोष, ग्रहदोष शांतीसाठीही ते फायदेशीर ठरते. रक्षा सूत्र बांधल्याने मनोबल, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे धर्मशास्त्रात नमूद आहे.

शक्य असल्यास श्रावण पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी आणि रक्षा सूत्र बांधताना ‘ॐ येन बद्धो बलीराजा…’ हा मंत्र उच्चारावा. भावंडांमध्ये मनोमालिन्य असल्यास या दिवशी क्षमा मागून संबंध पुन्हा प्रगाढ करणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरणपूरक राखी वापरणे, अन्न वाया न घालवणे आणि वयोवृद्ध तसेच गरीब महिलांना राखी बांधण्याचा सन्मान देणे ही आजच्या काळाची गरज आहे. अशा रीतीने, रक्षाबंधन हा केवळ विधीपुरता सण नसून नात्यांची उब, रक्षणाचे वचन आणि धार्मिक पुण्य एकत्र आणणारा पवित्र सोहळा आहे, जो योग्य श्रद्धा, भक्ती आणि सन्मानाने साजरा केल्यास आयुष्यात विलक्षण आनंद, समाधान आणि आध्यात्मिक लाभ प्रदान करतो.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.