MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

सोलापूर-मुंबई वंदे भारत 20 कोचसह धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार!

Written by:Rohit Shinde
Published:
गुरुवारी मुंबईकडून तर शुक्रवारी सोलापूरकडून 20 डब्यांची वंदे भारत धावणार आहे. त्यामुळे पुणे, कल्याण, ठाणे आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोलापूर-मुंबई वंदे भारत 20 कोचसह धावणार; प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार!

वंदे भारत एक्स्प्रेसला अल्पावधीत प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या वाढीव भाड्यामुळे सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद मंदावला होता. मात्र, गाडीत उपलब्ध असलेल्या सुविधा आणि वेळेची मोठी बचत यामुळे हळूहळू प्रवासी या गाडीला पसंती देऊ लागले. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने 28 ऑगस्टपासून या गाडीची रचना 20 डब्यांची करण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर-मुंबई वंदे भारत 20 कोचसह

गुरुवारी मुंबईकडून तर शुक्रवारी सोलापूरकडून 20 डब्यांची वंदे भारत धावणार आहे. त्यामुळे पुणे, कल्याण, ठाणे आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत: येणाऱ्या दसरा-दिवाळीच्या सणांच्या काळात या गाडीत आरक्षण मिळवणे अधिक सोपे होईल. गाडीच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. पूर्वीप्रमाणेच ती धावणार आहे. कालपर्यंत वंदे भारतमध्ये 16 डबे होते – त्यात 14 चेअर कार आणि 2 एक्झिक्युटिव्ह चेअर कार होत्या. आता डब्यांची संख्या 20 झाल्याने 17 चेअर कार आणि 3 एक्झिक्युटिव्ह चेअर कार उपलब्ध असतील. या बदलामुळे सुमारे 286 अतिरिक्त जागांची वाढ होईल. सध्या एका फेरीत 1,128 प्रवासी प्रवास करतात; तर आता ही क्षमता 1,414 प्रवाशांपर्यंत वाढणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार!

सोलापूर–मुंबई वंदे भारत आणि नांदेड–मुंबई वंदे भारत गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये 20 डब्यांची सोय होईल. परिणामी हजारो प्रवाशांना पुणे–मुंबई दरम्यान वेटिंगशिवाय जलद प्रवासाची संधी मिळणार आहे अशी माहिती रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. सोलापूर–मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही हाय-स्पीड ट्रेन 11 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली. गाडी क्रमांक 22226 ही ट्रेन सोलापूरहून (गुरुवार वगळता) दररोज सकाळी ६:०५ वाजता सुटते आणि दुपारी 12.35 वाजता मुंबईत पोचते. ही ट्रेन 6.30 तासांत 455 किमी अंतर पूर्ण करते. मुंबईकडून गाडी क्रमांक 22225 बुधवार वगळता दररोज सायंकाळी 4:05 वाजता सुटते.

या निर्णयामुळे खरंतर प्रवाशांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी काळात या भागातून प्रवास करणाऱ्यांना वेगवान आणि सुरक्षित आरामदायी प्रवासाची अनुभती मिळणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणाऱ्या वाढत्या पसंतीचे हे द्योतक आहे. त्यामुळे आगामी काळात इतर गाड्यांमध्येही अशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत.