सर्वत्र बिबट्याची दहशत, अचानक बिबट्या समोर आला तर? कसा करायचा बचाव ?

महाराष्ट्रातील ग्रामीण भागांसह शहरांमध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. सर्वत्र या हिंस्त्र वन्यप्राण्याचे दर्शन घडत असल्याने नागरिक भयभीत आहेत. अशा परिस्थितीतमध्ये बिबट्या समोर आल्यास बचाव कसा करायचा? सविस्तर जाणून घेऊ...

महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे, राज्यात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत, सध्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या बिबट्या नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचं दिसून येत आहे, अनेकदा तो आपली शिकार समजून माणसांवर हल्ले करत आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेष: ग्रामीण भागांमध्ये घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना या बिबट्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बिबट्या समोर आला तर बचाव नेमका कसा करायचा ? असा प्रश्न सर्वांना पडत असतो. त्याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ…

बिबट्या समोर आला तर…बचाव कसा करायचा ?

बिबट्या समोर आला तर घाबरणे स्वाभाविक आहे, परंतु योग्य पद्धतीने प्रतिसाद दिल्यास जीव वाचवणे शक्य होते. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे

शांत राहून सावधानता बाळगा !

बिबट्याला अचानक हालचाल, किंकाळ्या किंवा पळापळ यांमुळे धोका जाणवतो आणि तो हल्ला करू शकतो. म्हणून स्थिर उभे राहून त्याच्या डोळ्यात न पाहता त्याच्या हालचालीकडे लक्ष द्या.

 बिबट्याचा मार्ग मोकळा करा

कोपऱ्यात अडकलेला बिबट्या नेहमी आक्रमक होतो. हळूहळू मागे सरकून त्याला जागा द्या, पण पाठ फिरवू नका. पाय न वळवता मागे सरकणे अधिक सुरक्षित असते.

स्वतःला मोठे आणि उंच दाखवा

हात वर करून, अंगावरील कपडे पसरून किंवा उपलब्ध वस्तू उंचावून आपली उपस्थिती मोठी दाखवल्यास बिबट्या घाबरून दूर जाऊ शकतो. मात्र हे करताना कोणतेही अचानक उड्या मारणे किंवा धावणे टाळावे.

वस्तूंचा मोठ्याने आवाज

बिबट्याला हुसकावण्यासाठी जोरदार पण नियंत्रित आवाज, टाळ्या किंवा काठीने आवाज करणे उपयोगी ठरू शकते, पण घाबरून ओरडणे किंवा किंचाळणे टाळावे, कारण त्यामुळे तो अधिक चिडू शकतो. आवाज हळूहळू वाढवत गेल्यास तो दूर जाण्याची शक्यता जास्त असते. गाण्यांचा अथवा इतर वस्तूंचा आवाज

मानवी गट तयार करा

जंगल परिसरात किंवा बिबट्या दिसलेल्या भागात कधीही एकटे फिरू नये. बिबट्या समोर आला तर जवळच्या लोकांना शांतपणे मदत बोलवा, फोन असेल तर वनविभाग किंवा स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा. मदत येईपर्यंत बिबट्याला उत्तेजित न करता अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बिबट्याचा मानवी वस्तीत वावर आणि चिंता

मानवी वस्तीत बिबट्याचा वाढता वावर ही गंभीर चिंता बनली आहे. जंगलातील अधिवास कमी होणे, अन्नाची कमतरता आणि मानवी विस्तार यामुळे बिबट्यांना गावांच्या दिशेने यावे लागते. त्यामुळे पशुधनाचा बळी जाणे, भीतीचे वातावरण निर्माण होणे आणि अपघाती संघर्ष वाढणे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये दहशत पसरत असून मुलांचे सुरक्षित हालचाल, रात्रीचा वावर आणि शेतीकामावर परिणाम दिसून येतो. वनविभाग, ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे, जाणीवजागृती वाढवणे आणि सुरक्षितता पाळणे ही काळाची गरज बनली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News