राज्यातील पुरग्रस्त भागातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत; सोयाबीनला कवडीमोल भाव

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी सध्या होताना दिसत आहे. कारण, सोयाबीनची प्रत ढासळलेली असल्याने कमी दर मिळताना दिसत आहे.

यंदाच्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, मुळे कुजली आणि उत्पादन क्षमता घटली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घेतलेले सोयाबीन पीक आता नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे.

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण

राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 35 हजार 658 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 31 हजार 553 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3525 ते 4255 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 2400 क्विंटल सोयाबीनला 3950 ते 4670 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. नांदेड मार्केटमध्ये सर्वात कमी 17 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 3800 ते 4100 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

सोयाबीन उत्पादक मोठ्या अडचणीत

प्रत चांगली न राहिल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या चांगला दर मिळताना दिसत नाही. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे. सरकारकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे. एकूणच, यंदाची अतिवृष्टी आणि पूरस्थितीने महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे आणि पुनर्वसनाची गरज आहे. अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News