एसटी बसच्या अपघातांची वाढती संख्या हा खरोखरच गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. अनेक प्रकरणांमध्ये मद्यपान केलेले चालक हे अपघाताचे प्रमुख कारण ठरले आहेत. अशा चालकांमुळे प्रवासी आणि इतर वाहनचालकांचे जीवन धोक्यात येते. राज्य परिवहन विभागाने यावर नियंत्रण आणण्यासाठी ब्रेथ अॅनालायझर मशीन बस चालकांच्या केबिनमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
केबिनमध्ये ब्रेथ अनालायझर बसविणार !
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षभरात एसटीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होणार आहेत. या नव्या बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अॅनालायझर यंत्र बसवले जाणार आहे. या यंत्रणेमुळे चालकाने बस सुरू करण्यापूर्वी श्वास परीक्षण करणे बंधनकारक असेल. परीक्षणात मद्यपान केल्याचे आढळल्यास बस सुरू होणार नाही. नव्या बस खरेदी करताना ही यंत्रणा बसवण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मद्यपी चालकांवर नियंत्रण येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळाचा निर्णय
एसटीमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गावखेड्यांपासून ते शहरापर्यंत या सेवेशी अनेक नागरिक जोडलेले आहेत. प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे हे एसटी प्रशासनाचे पहिले कर्तव्य मानले जाते. मात्र काही चालक कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात किंवा प्रवाशांशी गैरवर्तन करतात. अशा घटनांमुळे अपघात होऊन प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
ग्रामीण भागात, एसटी बस हे शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, रुग्णालय आणि शहरांशी जोडणारे प्रमुख साधन आहे. अनेक दुर्गम गावांपर्यंत एसटीच पोहोचते, त्यामुळे ती ग्रामीण विकास आणि आर्थिक व्यवहार यांचा आधार बनली आहे. शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि सामान्य लोकांसाठी ही सेवा परवडणारी आणि विश्वासार्ह आहे. शहरी भागात, एसटी बस सेवा महानगरांतील प्रवास सुलभ करते, तसेच इतर वाहतुकीवरील ताण कमी करते. अशा परिस्थितीत एसटीतील प्रवाशांच्या सुरक्षेला अलीकडे विशेष प्राधान्य दिले जात आहे.











