MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

TCS कडून 80% कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा; कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण

Written by:Rohit Shinde
Published:
मध्यंतरी 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा करणाऱ्या टीसीएसने कर्मचाऱ्यांना चक्क पगारवाढ दिली आहे. 80 टक्के कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिल्याची माहिती समोर येत आहे.
TCS कडून 80% कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा; कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी अचानक 12 हजार कर्मचरी कपातीची घोषणा केल्यानंतर टीसीएसने अचानक पगारवाढ जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांचा आनंदात गगनात मावेना. यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ आणि मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही पगारवाढ 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. या संदर्भात कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी मिलिंद लक्कड यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती दिली आहे. या घोषणेमुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

80% कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून पगारवाढ

विशेष म्हणजे ही पगारवाढ 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. या संदर्भात कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी मिलिंद लक्कड यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत टीसीएससह इतर प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांच्या उत्पन्नात कमी वाढ दिसून आली. जागतिक स्तरावर कमी झालेल्या तंत्रज्ञान खर्चाचा आणि क्लायंटच्या निर्णयांमधील विलंबाचा परिणाम या कंपन्यांवर झाला आहे. त्यामुळे कंपनीने आधी पगारवाढीबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता, पण आता ही घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह परत आला आहे. या निर्णयामुळे जवळपास 4 ते 5 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

12 हजार कर्मचारी कपातीचे कारण काय?

कंपनीच्या 12 जून 2025 पासून लागू झालेल्या नव्या धोरणानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला एका वर्षात 225 दिवस पूर्ण करावे लागतील. म्हणजेच, कंपनीला थेट महसूल देणाऱ्या प्रकल्पावर त्यांना एका वर्षात किमान इतके दिवस काम करावे लागेल. याशिवाय, बेंचवर राहण्याचा (म्हणजे प्रकल्पाबाहेर राहण्याचा) कालावधी आता फक्त 35 दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. पूर्वी हा कालावधी खूप जास्त होता. या धोरणामुळे हजारो कर्मचाऱ्यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे, विशेषतः जे नवीन प्रकल्प मिळेपर्यंत बेंचवर राहतात. त्यामुळे आता अनेक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा आगामी काळात फटका बसेल.

सध्या कंपनीत सुमारे 6.13 लाख कर्मचारी काम करत आहेत. त्यानुसार, सुमारे 12 हजार 200 लोकांना कपातीचा फटका बसू शकतो. ही कपात टीसीएसच्या सर्व देशांना आणि कार्यक्षेत्रांना प्रभावित करेल, जिथे कंपनी काम करत आहे. टीसीएसने म्हटले आहे की ते प्रभावित कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधी वेतन तसेच अतिरिक्त विच्छेदन पॅकेज, आरोग्य विमा आणि आउटप्लेसमेंट सहाय्य प्रदान करेल. टाळेबंदीचे कारण एआय नाही तर पुनर्कौशल्य आणि तैनातीतील मर्यादा आहेत.