बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि चोरी-दरोड्यांच्या घटना अलीकडच्या काळात चिंतेचा विषय बनलाय. ग्रामीण आणि मुख्य रस्त्यांवरील वाढता चोरट्यांचा वावर, आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि रात्रीची अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अशा घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून येते. दुकाने, घरे, तसेच महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले असून स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या विरोधात देखील संताप व्यक्त केला जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता बीडमधून समोर आली आहे. श्री साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या एका कुटुंबाला चोरट्यांनी भर रस्त्यात लुटल्याची घटना समोर आली होती.
बीड-गेवराई रस्त्यावर नेमकं काय घडलं ?
बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर मध्यरात्री भीषण रोड रॉबरीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील काही महिला प्रवासी या महामार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करत होत्या. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अचानक वाहनाला अडवत महिलांवर हल्ला चढवला. चोरट्यांकडे बंदूक, चाकू यांसारखी धारदार शस्त्रे होती. शस्त्रांचा धाक दाखवत महिलांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याजवळील दागिने, मौल्यवान वस्तू, तसेच रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलांकडून प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली असून तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकेबंदीही केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ट्रकचालकाने सांगितला भयंकर घटनाक्रम
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचे समोर आलं आहे. एका ट्रक चालकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. चोरट्यांच्या हाती शस्त्र असल्याने त्यांना रोखण्याची हिंमत ना प्रवासी भाविकांची झाली, ना माझा झाली, असेही ट्रक चालकाने स्वत: बनवलेल्या एका व्हिडिओतून सांगितलं आहे.
तेलंगणा येथील शिवप्रसाद पौने आपल्या कुटुंबासह खासगी वाहनाने शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान, बीडमार्गे प्रवास करत असताना त्यांचे वाहन गेवराई जवळील गढी येथे थांबले असता चोरट्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी लोखंडी रॉडसह अन्य हत्याराने पौने कुटुंबाला धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र इतर दागिने चोरट्यांनी काढून घेतले. तसेच, पुरुषांच्या गळ्यातील चैन आणि अंगठ्या असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज हिसकावून चोरटे पसार झाले. याप्रकरणी, भाविक शिवप्रसाद यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.











