आज ठाण्यात मेट्रोचे ट्रायल रन; 10 स्टेशन्सवर चाचणी, मार्ग कसा असेल?

ठाण्यातील मेट्रो 4 या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गावर सोमवारी म्हणजेच आज चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे मेट्रोचे स्वप्न अखेरीस सत्यात उतरताना दिसत आहे.

ठाण्यात पहिली मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.  सोमवारपासून ठाणे मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. वडाळा ते कासारवडवली असा या मेट्रोचा रूट असेल या अंतर्गत दहा स्टेशन्स जोडले जातील. या पहिल्या पहिल्या मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास अतिशय सुखद आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे.  याशिवाय शहरातील  वाहतूक कनेक्टिव्हिटी सुद्धा मजबूत होईल. त्यामुळे प्रवाशांना या मेट्रोमुळे मोठी सोय होईल.

गायमुख ते कॅडबरी जंक्शन मार्गावर ट्रायल

आता ठाणेकरांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण, वडाळा ते कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर चाचणी घेण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाण्यातील मेट्रो मार्गावर चाचणीची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता मेट्रोचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मार्ग लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मागील काही वर्षात ठाण्याचा मोठा कायापालट झाला आहे. मात्र कमतरता होती ती मेट्रोची. एकीकडे मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना दुसरीकडे ठाण्याला मात्र एकही मेट्रो मिळाली नव्हती. अखेर आता ठाण्याची मेट्रो रुळावर धावणार आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी हा मोठा क्षण आहे.

मार्गावरील १० स्थानके नेमकी कोणती?

नवरात्रोत्सवाच्या दिवशी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशी 10.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 स्थानके आहेत. कॅडबरी जंक्शन,माजिवडा,कापूरबावडी,मानपाडा,टिकुजीनीवाडी,डोंगरी पाडा,विजय गार्डन,कासारवडवली,गोवनीवाडा,गायमुख अशी ही प्रमुख स्थानके या मार्गावर असणार आहेत.

या मेट्रो 4 मार्गासाठी कारशेड अद्याप तयार झालेले नाहीये. त्यामुळे ही मेट्रो मार्गिकेच्या उन्नत मार्गावरच गाड्या उभ्या करण्याची सुविधा एमएमआरडीएने तयार केली आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यावर आरडीएसओकडून मेट्रो गाड्यांची चाचणी होईल. यानंतर महानगरपालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी म्हणजेच सीएमआरएस हे तपासणीसाठी येतील. त्यानंतर ही मेट्रो कायमस्वरूपी धावण्याचा मार्ग मोकळा होईल.

About Author

Rohit Shinde

Other Latest News