गुहागर- ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेत. भास्कर जाधव आपल्या राजकीय वक्त्यव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता त्यांच्या एका भाषणातील वक्तव्यानं भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज असा वाद त्यांच्या मतदारसंघात निर्माण झालाय.
गुहागर मधील हेदवतड इथं झालेल्या सभेमध्ये खोतकीवरून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद संपवल्याचा विधान भास्कर जाधव यांनी केलं होतं. त्यावर गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ भास्कर जाधव यांच्या विरोधात आक्रमक झालाय.
ब्राह्मण सहायय्क संघाची टीका
भास्कर जाधव यांचं विधान ब्राह्मण सहाय्यक संघाला खटकलं आणि यावरून पत्रप्रपंच सुरु झाला. गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाने भास्कर जाधवांना उद्देशून पत्र लिहिलंय. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला भास्कर जाधव बाधा आणत आहेत. राजकीय प्रवासात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्या आहेत. अशी टीका पत्रात करण्यात आलीय.
पत्र लिहून देणारा अनाजीपंत कोण?- भास्कर जाधव
तर हे पत्र लिहून देणारा अनाजीपंत कोण ? असा खरमरीत सवाल भास्कर जाधवांनी केलाय. गुहागरच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्यामुळं ब्राह्मण समाजाची पंचायत समिती सभापती झाली, अशी आठवणही जाधव यांनी करून दिली..
भास्कर जाधवांच्या पत्रात काय?
गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला. मी येण्यापूर्वी गुहागरमध्ये विरोधी पक्ष निवडणूक हरला की त्याच्या घरावर दगड पडायचे हा दहशतवाद आपण गुहागरमध्ये आल्यानंतरच संपला. हेदवतड इथल्या भाषणात मी कुठेही ब्राह्मण या शब्दाचा किंवा जातीचा उल्लेखही केला नव्हता. परंतु, माझ्या एका वाक्याचा संबंध तुम्ही समाजाशी जोडलात. तर मग तुम्ही पत्र काढून माझ्याबद्दल जे लिहिलं आहे ते मराठा समाजात जाऊन मी सांगावं का?असा सवाल जाधवांनी प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात केलाय.
वाद आणखी तापण्याची शक्यता
या वादात आता हिंदू महासंघानं देखील उडी घेतलीय.. परिणामी जाधव विरुद्ध ब्राह्मण वाद आणखीच पेटलाय. आपणाला कुणा एका समाजाला दुखवायचं नाही, असं जाधव सांगतायत. तर ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यामुळं आता हा वाद थांबणार कसा? हा खरा प्रश्न आहे.





