MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

…तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो, आत्मनिर्भर भारत व महाराष्ट्र कुठल्याशी शक्तीपुढे झुकणारा नाही – उपमुख्यमंत्री

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
देश बदलतोय, विकासाचे वारे वाहू लागले आहेत. दहा वर्षापूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था पहिल्या दहातही नव्हती. ती आज पहिल्या पाच देशात मोजली जाते, आणि लवकरच ती जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल.
…तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो, आत्मनिर्भर भारत व महाराष्ट्र कुठल्याशी शक्तीपुढे झुकणारा नाही – उपमुख्यमंत्री

Independence Day 2025 – जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताला आता जगातला कोणताही नेता रोखू शकणार नाही. प्रगतीचा आणि विकासाचा हा महारथ कोणीच थांबवू शकणार नाही. आत्मनिर्भर भारत हा कुठल्याशी शक्तीपुढे झुकणारा नाही, हे मी खात्रीनं सांगतो. भारत झुकणार नाही व महाराष्ट्रही झुकणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण पार पडले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

शहीदांचं स्मरण आपल्याला सदैव व्हायला हवं…

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश स्वतंत्र झाला, त्याला आता 79 वर्ष उलटली आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली नसती, रक्त सांडलं नसतं, तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो. देशात-परदेशात आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाची नवी क्षितिजे गाठत असलेल्या प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्र्यदिनाचा शुभेच्छा देत म्हणाले की, लोकशाहीतला सर्वात पवित्र असा सण म्हणजे आजचा दिवस आहे. प्रगतीच्या पाऊलखुणा, विकासाची ही घोडदौड आपल्याला पाहायला मिळाली नसती. त्यामुळे केवळ स्वातंत्र्यदिनीच नाही तर शहिदांचं स्मरण आपल्याला सदैव व्हायला हवं.

हम भी किसीसे कम नही…

आज आपला भारत देश महासत्तांच्या डोळ्याला डोळे भिडवून स्वाभिमानानं उभा आहे! देशाची प्रगती अनेकांना बघवत नाही. त्यामुळे आपले शत्रूसुध्दा वाढलेत. पण, हम भी किसीसे कम नही हे आपण दाखवून दिलं आहे. “विकसित होता है देश हमारा, रंग लाती है हर कुर्बानी, फक्र से हम अपना परिचय देते, हम सभी है हिन्दुतानी”  आमच्या आयाबहिणींचं कुंकू पुसण्याचं धाडस करणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडं ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्यानं मोडलं.

बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहन…

भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली आहे. सहा पाकिस्तानची विमानं सुदर्शन प्रणालीनं काही मिनिटात पाडली. पुन्हा नांगी वर काढता येणार नाही, अशी पाकिस्तानची नांगी ठेचली आहे. देशाच्या सरहद्दीवर आपल्या फौजा डोळ्यात तेल घालून संरक्षण करत आहेत. मी त्यांनाही वंदन करतो. असं शिंदे म्हणाले. दरम्यान, बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर दुसरीकडे भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.