BJP Vs Sanjay Raut – मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन केले. जरांगे पाटलांच्या ८ पैकी ६ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळं आता मराठा आरक्षणावर टिका करणाऱ्यांना यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टिका भाजपाने विरोधकांवर केली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर संजय राऊत यांची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. कधी ‘मुका मोर्चा’, कधी आंदोलकांना ‘ढेकुण’ म्हणत त्यांनी मराठी मातीचा अपमान केला आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धैर्याने केलं.
त्यामुळे आझाद मैदानात जाऊन आंदोलकांना न भेटणारे, मराठा समाजाची हेटाळणी करणारे संजय राऊत आरक्षणावर बोलण्याच्या अधिकार नाही, अशी टिका भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
राऊतांनी काँग्रेसची चाटूगिरी केली
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनतेचं आणि त्यांच्या आईचं आशीर्वाद आहे. त्यामुळे अशा कितीही शिव्या दिल्या, तरी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला. बिहारमधील राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल घृणास्पद शब्द वापरण्यात आले. जवळपास शंभर वर्षे जगलेली आणि राजकारणाशी काही संबंध नसलेल्या आईबद्दल अशा पद्धतीने बोलणं हा संतापजनक प्रकार आहे. मात्र, त्याचं समर्थन करून संजय राऊत काँग्रेसची दलाली करत आहेत.
काँग्रेस दलाली बंद करा
मत चोरीचा मुद्द्यावर राहुल गांधी आता हायड्रोजन बॉम्ब आणणार असं कौतुक संजय राऊत करत आहेत. पण राहुल गांधी यांचे आतापर्यंतचे सर्व बार फुसके निघाले आहेत, राहुल गांधींचे आतापर्यंतचे सर्व राजकीय प्रयोग फसले असताना संजय राऊत त्यांची स्तुती करतात, ही दुर्दैवी बाब आहे. ज्यांना लोकसभेत व विधानसभेत पुन्हा पुन्हा मतदारांनी नाकारलं, अशा नेत्यांची चमचागिरी करणं म्हणजे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेचा अपमान आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची काय अवस्था झाली. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे, असंही नवनाथ बन म्हणाले.
मतचोरीचे आरोप म्हणजे जनतेचा अपमान
मतचोरीचे आरोप करून जनतेच्या मतांचा आणि निर्णयाचा अपमान करण्याचं काम संजय राऊत करत आहेत. ज्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मत देऊन निवडून दिलं, त्या जनतेला कमी लेखण्याचा प्रयत्न माफ केला जाणार नाही. येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जनता घरचा रस्ता दाखवेल, असा इशारा नवनाथ बन यांनी दिला.





