गणेशोत्सवासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसंच विविध ठिकाणांहून अनेक गणेशभक्त कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सध्या वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकणात जाण्यासाठी हजाराच्या आसपास एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यातील काही बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर सध्या बसेसची देखील गर्दी आहे.
मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडी
कोकण रेल्वेसह, कोकणात जाण्यासाठी खास बसची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. अतिरिक्त रेल्वे, बस गाड्याही सोडण्यात आल्या आहेत. शिवाय अनेकजण आपापल्या खासगी वाहनांतूनही गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघाले आहेत. शनिवार २३ ऑगस्ट २०२५ पासून कोकणवासीय कोकणाकडे निघाले असून मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. आज रविवार असल्याने तसंच कोकणात जाणाऱ्या वाहनाची संख्याही वाढल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे.
गणेश भक्तांना मोठा मनस्ताप
गणेश भक्तांनी शुक्रवार रात्रीपासूनच कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लोणेरे येथे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सर्विस रोडच्या अरुंद रस्त्यावरून सुरू आहे. तसंच गेल्या दोन दिवसांपासून अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे आज पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
गणेशोत्सवात अवजड वाहनांना बंदी
23 ते 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी दिवसभर तसेच 6 व 7 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी राहणार आहे. महामार्गावर अपघात झाल्यास वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच वाहनदुरुस्ती पथकही सज्ज असणार असल्याची माहिती मिळत आहे. या बंदीमधून दूध, औषधे, इंधन भाजीपाला, नाशिवंत माल अशा साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजतापासून ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यानंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल.





