ठाणेकरांसाठी खरंतर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता. ठाण्यामध्ये मोठ्या प्रतीक्षेनंतर मेट्रोची ट्रायल रन आज पार पडली. ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झालं. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली. यावेळी या सोहळ्याला ठाणेकरांनी देखील मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी पहिल्या ऐतिहासिक प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
ठाणे मेट्रोची-4 ट्रायल रन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रोची ट्रायल घेतली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती होती. मेट्रो 4 आणि 4 अ ची 35 किमी लांबी असून या मेट्रोचं काम 2027 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असून या मेट्रोसाठी 16 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

“मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विशेष अभिनंदन करतो, त्यांनी मेट्रोचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती त्यासाठी स्वत: लक्ष घालून अनेक अडचणी सोडवल्या. अडचणी दूर करुन मोगरपाडातील जमीन डेपोसाठी मिळवून दिली. ” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले.
मार्गावरील १० स्थानके नेमकी कोणती?
नवरात्रोत्सवाच्या दिवशी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशी 10.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 स्थानके आहेत. कॅडबरी जंक्शन,माजिवडा,कापूरबावडी,मानपाडा,टिकुजीनीवाडी,डोंगरी पाडा,विजय गार्डन,कासारवडवली,गोवनीवाडा,गायमुख अशी ही प्रमुख स्थानके या मार्गावर असणार आहेत.
या मेट्रो 4 मार्गासाठी कारशेड अद्याप तयार झालेले नाहीये. त्यामुळे ही मेट्रो मार्गिकेच्या उन्नत मार्गावरच गाड्या उभ्या करण्याची सुविधा एमएमआरडीएने तयार केली आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यावर आरडीएसओकडून मेट्रो गाड्यांची चाचणी होईल. यानंतर महानगरपालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी म्हणजेच सीएमआरएस हे तपासणीसाठी येतील. त्यानंतर ही मेट्रो कायमस्वरूपी धावण्याचा मार्ग मोकळा होईल.
◻️LIVE📍 ठाणे 🗓️ 22-09-2025 📹 मेट्रो 4 व 4ब – पाहणी दौरा – लाईव्ह https://t.co/dKAGnu17ON
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2025











