शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यातील महायुती यांच्यात 36 चा आकडा…. राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत तर दुसरीकडे ठाकरेंना सुद्धा त्याच भाषेत उत्तर द्यायला सरकारमधील नेतेमंडळही तयार असतात. त्यातच मुंबई आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचा महापौर बसवायचाच आणि ठाकरेंची उरली सुरली सत्ताही नेस्तनाबूत करायची यासाठी भाजपने जंग जंग पछाडल आहे. निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती सरकार हा वाद विकोपाला गेला असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येतेय. महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
काय आहे जबाबदारी?
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्याकरीता मुंबई येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क, दादर येथील महापौर बंगला” या जागेची निवड केली आहे. या स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार २७ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन करण्यात आलेली होती. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने शासननिर्णय काढत ही नियुक्ती जाहीर केली.

या निर्णयानुसार, उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांसाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याचबरोबर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. न्यासात पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही स्थान देण्यात आले आहे.
पेडणेकर यांनी मानले फडणवीसांचे आभार
दरम्यान नियुक्तीनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. तर आदित्य ठाकरे हे त्यांचे नातू आहेत. शेवटी सरकारनं घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा आहे. कारण सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत विचाराचे आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते सुसंस्कृत असे नेते आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली.











