मराठवाडा प्रदेशात अलीकडील पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीन, तूर, कापूस आणि मका यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने हजारो कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित केले खरे, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
लवकरच उद्धव ठाकरेंचा संवाद दौरा
5 तारखेपासून मी मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर जाणार आहे. शेतकऱ्यांशी मी थेट संवाद साधणार आहे. दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील असं पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. काही हजार कोटी तिजोरीतून रिलीज केले असं ते म्हणतात, तर ते पैसे मिळाले का याबद्दल विचारणार आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुसती आगपाखड करायला किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही, पण ते पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची योजना मांडली.

ठाकरेंच्या दौऱ्याचे नियोजन कसे ?
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात ‘दगाबाजरे’ संवाद दौऱ्याची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ‘हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे’, असा थेट आरोप करत, सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ठाकरे मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि सोलापूरला भेट देणार आहेत. या दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरल्याची पार्श्वभूमी आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र, ‘दोन मिनिटं शेतकरी, दहा मिनिटं कार्यकर्ते’ असे म्हणत या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या बांधावरून पक्षाची बांधणी करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.











