Nagpur News : सध्या राज्यभरात पायाभूत सोयीसुविधांवर भर दिला जात आहे. गेल्या पाच वर्षात नवनवे उड्डाणपूल, महामार्ग सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांना चांगला प्रवास करता यावा यासाठी सरकार मोठी पाऊलं उचलत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान नागपूर आणि विदर्भातील पायाभूत सोयीसुविधांमध्ये मोलाची भर पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुला’चे लोकार्पण करण्यात आले.

20 मिनिटांचा प्रवास आता फक्त 3 मिनिटांत
हा पूल नागपूरकरांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे 20 मिनिटांचा प्रवास आता फक्त 3 मिनिटांत होणार आहे. बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरू होणारा हा उड्डाणपुल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत 2.85 किमी लांबीचा आहे. नागपूर शहरातील सर्वात वर्दळीचा हा उड्डाणपूल असून वाडी पोलीस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उ्डडाणपूल 1.95 किमी लांबीचा आहे. उड्डाणपुलाचे नामकरण ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने करण्यात आले असून, यामार्फत त्यांच्या अद्वितीय ज्ञानसाधनेचे आणि भविष्यवेधी कार्याचे स्मरण अधिक दृढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नागपूरच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर हे तंत्रज्ञान आणि फिनटेक हब म्हणून विकसित होत आहे. तसेच येथे संत्रा प्रक्रिया उद्योग, राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क, 30,000 कोटींच्या गुंतवणुकीसह कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, सौर मॉड्युल निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या गुंतवणुकीतून लाखो रोजगार निर्माण होणार असून, नागपूर स्मार्ट सिटी म्हणून उदयास येईल. फ्लॅश बससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाहतूक सुविधा रिंगरोडवर सुरू होणार असून, नागपूरच्या प्रगतीला वेग देणार आहेत. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि मजबूत पायाभूत सुविधा नागपूरला औद्योगिक, तांत्रिक आणि आर्थिक विकासाचे केंद्रस्थान बनवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.