काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं, दरम्यान या प्रकरणात पूजा गायकवाड सध्या जेलमध्ये आहेत. तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तिचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजा गायकवाडला या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पुढे या प्रकरणात मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूजा गायकवाडला जामीन नाहीच!
आरोपी असलेल्या नर्तकी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस.मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला आहे. तिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, शिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद यावेळी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांच्याकडून कोर्टात करण्यात आला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे राजपूत यांनी तर आरोपी पूजा गायकवाड हिच्या वतीनं आर. डी. तारके यांनी बाजू मांडली, न्यायालयानं दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर अखेर पूजा गायकवाड हिचा जामीन फेटाळून लावाला आहे, त्यामुळे आता तिच्या अडचणी वाढल्या आहेत.

गोविंद बर्गेंनी का आत्महत्या केली?
गोविंद बर्गे लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते. लुखामसला येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. ते पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी काही वाद झाल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती समोर येत आहे, पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. सकृतदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरी पोलीस गोविंद बर्गे यांच्यासोबत घातपात झाला का, ही शक्यताही पडताळून पाहत आहेत. गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.











