भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा आज सांगलीत विवाह होणार होता. त्यासाठी मोठ्या थाटात तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हळद, संगीत नाईट असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. आज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. परंतु या लग्नाआधीच मोठे अघटित घडले आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे.
स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलले !
गलीमध्ये अतिशय जल्लोषात हा विवाह सोहळा सुरू होता. परंतु स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक खालवल्याने हा विवाह सोहळा थांबवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. लग्नसोहळ्याची तयारी सुरू असताना समडोळ येथील मानधना फार्म हाऊसवरच ही घटना घडली. वातावरणात एकदम गोंधळ उडाला आणि रुग्णवाहिका येताच उपस्थितांना काहीतरी गंभीर घडल्याची चाहूल लागली. यानंतर स्पष्ट झाले की स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे.
घटनेनंतर त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. स्मृती मानधना व कुटुंबीय तातडीने रुग्णालयात दाखल झाले असून डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तरीही परिस्थितीची गंभीरता पाहता कुटुंबियांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे. स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज सायंकाळी 4:30 वाजता पार पडणार होता. क्रीडा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याने मोठ्या प्रमाणावर सजावट आणि तयारी करण्यात आली होती. परंतु आता हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे.
6 वर्षांचं प्रेम; पण, लग्नात मोठं विघ्न
स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता. यांचा अजून एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं तेनू लेके मैं जावांगा… या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत होते. मात्र एकूणच बऱ्याच काळापासून प्रतीक्षा असणारे हे लग्न अघटीत कारणामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. नव्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.






