MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

लग्नाच्या रुखवताची IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला ऑर्डर, दीड लाख द्यायला लावले; वैष्णवीच्या आई-वडिलांचा धक्कादायक खुलासा

Written by:Smita Gangurde
Published:
वैष्णवी हगवले आत्महत्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. हळूहळू यामध्ये राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांचीही नावं समोर येत आहेत.
लग्नाच्या रुखवताची IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला ऑर्डर, दीड लाख द्यायला लावले; वैष्णवीच्या आई-वडिलांचा धक्कादायक खुलासा

पिंपरी चिंचवड – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या सासरचे हगवणे कुटुंबीय सध्या तुरुंगात आहेत. पती शशांक, दीर सुशील, सासरा राजेंद्र, सासू लता आणि नणंद करिश्मा हे सगळेजण सध्या तुरुंगवास भोगतायेत. हगवणे यांना शस्त्र परवाना देण्याच्या प्रकरणात, शशांकचे मामा, आयपीएस पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आलीय. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. शशांकचे मामा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीनं वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात रुखवत केलं होतं. त्यासाठी दीड लाख रुपये घेतले होते, अशी माहिती वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी दिलीय.

रुखवत तुम्ही करु नका, आमच्या पाहुण्या सुपेकर यांच्याकडे रुखवताची ऑर्डर द्या, असं वैष्णवीच्या सासूने आणि नणंदेनं कस्पटे कुटुंबाला कळवलं होतं. हे दीड लाख रुपयेही रोख आणि चेकच्या रुपात घेण्यात आले. ५० हजारांची रक्कम रोख स्वरुपात घेण्यात आली. तर १ लाख रुपये चेकद्वारे घेण्यात आले होते. वैष्णवीच्या आईच्या खात्यातून हा सगळा व्यवहार झाला होता. आता अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळं सुपेकर यांच्या पत्नीविरोधातही कारवाई होणार का, हे आता पाहावं लागणार आहे.

सुपेकरांची तडकाफडकी बदली

हगवणेंच्या शस्त्र परवान्याबाबत जालिंद सुपेकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर सुपेकर यांचं डिमोशन करण्यात आलं असून त्यांची बदलीही करण्यात आलीय. विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा या पदावरुन त्यांची नियुक्ती आता उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आली आहे.

निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी फरार असलेल्या निलेश चव्हाणला शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आता ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. त्याच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. वैष्णवीच्या हत्येनंतर तिचं बाळ या निलेश चव्हाणकडे होतं. त्यानं बंदूक दाखवून कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसंच निलेशनं त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ केल्याचा प्रकारही समोर आला होता. या प्रकरणात फरार असलेल्या निलेशला नेपाळमधून अटक करण्यात आली.