मोठी बातमी! 1 जुलैनंतर नोंदणी करणाऱ्यांना मतदान करता येणार नाही, पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे 01 जुलैनंतर मतदार नाव नोंदणी करणाऱ्यांना मतदान करता येणार नाही.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये कुरघोड्या चालू झालेल्या असताना आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये 01 जुलैनंतर मतदार नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांना मतदान करता येणार नाही. कारण, राज्य निवडणूक आयोगाने या पूर्वीचं मतदारांची यादी अंतिम केलेली आहे.

01 जुलैनंतर नोंदणी केली असेल तर…

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. ही यादी 1 जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आली असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नवीन मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही. आयोगाच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे 35 लाख मतदारांना या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.

पुढील माहिती देताना निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले की, यापूर्वीच्या महापालिका निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन ती प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रानिहाय विभागली जात असे. मात्र या वेळी केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेली यादीच वापरण्याचे आदेश आहेत, स्थानिक पातळीवरून यादी घेण्यास परवानगी नाही. महापालिकेला आयोगाकडून ही यादी मिळाली असून लवकरच प्रभागनिहाय विभागणी सुरू होईल.

लवकरच प्रभागनिहाय आरक्षण…

आगामी निवडणुकीसाठी महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनाला मान्यता देण्यात आली असून, काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.पुणे महापालिकेच्या 2011 च्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित ही निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चार-चार सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असेल. या पाच सदस्यांच्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 38 (बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव) सर्वात मोठा आहे, जिथे लोकसंख्या सुमारे 1,23,000 इतकी आहे. त्यामुळे पुणेकरांना या बाबीची नोंद घ्यावी लागणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News